अटी-शर्तीत अडकलेल्या नोकरदार शेतकर्‍यांची दोन लाखांपर्यंतची विनाअट कर्जमाफी करावी!

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे शेतकर्‍यांची मागणी!

जळगाव/विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने सर्वच शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखांपर्यंतच्या कर्जाची सूट दिलेली नाही. अटी-शर्तीत अडकलेले अनेक नोकारदार शेतकरी शेतीच्याही कर्जात अडकलेले आहेत. कर्जाची गरज होती म्हणून (25 हजारांच्यावर मासिक उत्पन्न असलेल्या, इन्कमटॅक्स भरणार्‍यांना यातून वगळले असले तरी) नोकरदार शेतकर्‍यांनी शेतीवरील कर्ज काढले आहे.
कोरोना, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, हमी भावाची अनुपलब्धता या गर्तेत हे शेतकरी अडकले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या अटी-शर्तीत अडकलेल्या सर्वच नोकरदारांचे विनाअट दोन लाखापर्यंतच्या कर्जाला मुक्ती देऊन ते माफ करावे. अशी एकमुखी मागणी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे ‘पुण्यप्रताप’चे माध्यमातून असंख्य शेतकर्‍यांनी केली आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे याच नोकरदार कर्जदार शेतकर्‍यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीच्या पदरात मतांचे दान टाकले होते. या नोकरदार शेतकर्‍यांचे 2019 पर्यंतचे असलेले कर्ज विनाअट महाआघाडी सरकारने माफ करावे आणि दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या पदरात मदतीचा हात द्यावा, अशी एकमुखी मागणी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचेकडे ‘दैनिक पुण्यप्रताप’चे माध्यमातून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हाच शेतकरी नोकरदार वर्ग आताही भर उन्हातान्हात हाडाचे काडं करून महाराष्ट्रातील घरी बसलेल्या तेरा कोटी लोकांच्या मुखात सुखाने घास घालत आहे. सरकारने या कर्जमाफी न झालेल्या आणि अटी व शर्तीत अडकलेल्या सर्वच पगारदार नोकरदारांचे शेतीकर्ज माफ करावे, अशी मागणी कोरोना पार्श्‍वभूमीवर पुढे आली आहे.
नोकरदार असलेले हे शेतकरी मुळातच कौटुंबिक कारणाने कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. या नोकरदार शेतकर्‍यांनी जसे शेतीवर कर्ज काढले आहे, तसेच त्यांनी त्यांच्या नोकरीच्या पतपेढ्यांमधूनही मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे. त्यातल्यात्यात शेतीमालाचे अतिवृष्टीमुळे यंदा उत्पादन निघाले नाही. त्यातच कोरोना विषाणूने धडक मारल्याने एवढी तेवढी आशा होती तीही संपली असल्यामुळे हे मध्यमवर्गीय नोकरदार शेतकरी निराशेच्या गर्तेत लोटले आहेत.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी कर्जदार नोकरदार शेतकर्‍यांच्या मागणीचा सहानुभूतीपर्वक विचार करून अटी शर्ती वगळून तमाम नोकरदार शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज विनाविलंब आणि विनाअट माफ करावे, अशी मागणी ‘दैनिक पुण्यप्रताप’च्या माध्यमातून वंचित नोकरदार शेतकर्‍यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *