कौटुंबिक हिंसाचार ही मर्दानगी नव्हे; सुप्रिया सुळेंनी सुनावले

मुंबई: कौटुंबिक हिंसाचार करणं ही काही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज व्यक्त केलं.

कौटुंबिक हिंसा आणि महिलांची सुरक्षितता‘ या विषयावर सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक हिंसाचारावर चिंता व्यक्त करतानाच महिलांचा सन्मान करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या राज्यातील प्रत्येक महिलेला तिला तिचा आधार नकोय, तर तिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. तिला मान द्या… तिचा सन्मान करा… तिचं कौतुक करा… तिच्यावर प्रेम करा… तुम्ही जेवढं प्रेम कराल त्याच्या दसपटीने ती तुमच्यावर प्रेम करेल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

लॉकडाऊनच्या काळात महिलांसमोर फार मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी समुपदेशनची गरज भासणार आहे आणि त्यातून आपलं कुटुंब वाचवू शकतो. कौटुंबिक हिंसाचार यातून थांबेल असे नाही, परंतु यातून मार्ग काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न आम्ही करू शकतो. कौटुंबिक हिंसाचार हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे मदत करण्याची, त्यांच्यासोबत उभं राहण्याची ही वेळ आहे म्हणून हा विषय घेतल्याचे सांगतानाच कौटुंबिक हिंसाचारावर मात कशी करायची यावर मी पर्याय दिलेला नाही परंतु आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *