‘ओएमसी’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हटवल्यानंतर आॅटो इंधनच्या दैनंदिन किंमतीत सुधारणा होण्यास सुरुवात होईल. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. असे झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढू शकतात. १६ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करण्यात आलेला नाही आणि यामुळे सरकारने किरकोळ उत्पादनांवर परिणाम न करता दोन्ही उत्पादनांवरील उत्पादन शुल्क वाढविले’ अशी माहिती ओएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच सरकारी क्षेत्रातील एका अधिकाऱ्याने आता दररोज किंमत सुधार योजना सुरू झाल्यानंतर ऑटो इंधन काही दिवस तेजीत येऊ शकेल असे म्हटले आहे.

सरकारी सुत्रांनी असे संकेत दिले की, दररोजच्या किंमतीत सुधारणा केल्यावरही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक वाढ करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याचा अर्थ असा होईल की पेट्रोलियम उत्पादनांमध्ये दररोज ३०-५० पैशांची वाढ होऊ शकते किंवा तेल कंपन्या खर्च आणि विक्रीतील तफावत दूर करेपर्यंत कमी होऊ शकतात. दररोजच्या किंमतींच्या निरिक्षणानुसार किरकोळ किंमतीत झालेली वाढ तेलाच्या किंमती आणि जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत सध्या कच्च्या तेलाची किंमत ५० टक्के जास्त आहे. लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट झाली आहे.

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्का(एक्साइज ड्युटी)त वाढ केली आहे. सरकारच्या आदेशानुसार पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेसच्या स्वरूपात प्रतिलिटर आठ रुपये आकारले जातील. त्याचबरोबर विशेष अतिरिक्त शुल्क म्हणून पेट्रोलवर प्रतिलिटर २ रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 5 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे १० आणि १३ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर ६ मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही.