सीमावादात अमेरिकेची भारताला साथ; चीनला सुनावले

शिंग्टन (वृत्तसंस्था) : चीनबरोबर सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिकेने भारताला साथ दिली आहे. पूर्व लडाखमध्ये विनाकारण तणाव निर्माण करणाऱ्या चीनला अमेरिकेने सुनावले आहे. चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अ‍ॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.

दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादित नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो, असे अ‍ॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

यापूर्वी भारत-चीनमध्ये सीमावाद झाले. त्यावेळी अमेरिकेने थेट भूमिका घेतली नव्हती. पण यावेळी अमेरिकेने चीनला थेट फटकारले आहे. यामागे कोरोना व्हायरस सुद्धा एक कारण आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत चीन विरोधात मोठया प्रमाणावर संताप आहे. ट्रम्प प्रशासनाने तर या व्हायरसच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरले आहे.

चीनच्या दादागिरी, वर्चस्व गाजवण्याच्या सवयीमुळे पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या हद्दीमध्ये रस्ता बांधणीचे काम करत आहे. पण ते चीनला मान्य नाही. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. पॅनगाँग टीएसओ तलावाच्या उत्तरेला भारताकडून रस्ता बांधणीचे काम सुरु आहे. त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीन दावा सांगतो तिथून बऱ्याच लांब अंतरावर हे काम सुरु आहे. लष्करी ताकतीच्या बळावर शेजारी देशांचा आवाज दडपून टाकायचा ही चीनची रणनीती आहे.

दक्षिण चीनच्या समुद्रात चीन अशाच पद्धतीने वागत आहे. पण कुठल्याही परिस्थितीत चीनला दादागिरी खपवून घ्यायची नाही हीच भारताची भूमिका आहे. ५ मे रोजी पॅनगाँग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली होती. दोन्ही बाजूचे सैनिक यामध्ये जखमी झाले. तेव्हापासून लडाखमध्ये तणाव वाढत चालला आहे. चीनने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये रस्ता बांधला मग, आम्ही आमच्या भागामध्ये रस्ता बांधू शकतो अशी भारताची भूमिका आहे. हिंसाचार आणि वाढत्या तणावामुळे सध्या रस्त्याचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.

Previous post वृत्तपत्रांच्या थकलेल्या कोट्यवधींच्या देयकांसाठी शिखर संस्था सुप्रीम कोर्टात
Next post अस्तित्व दाखविण्यासाठीच भाजपचा आंदोलनाचा फार्स : थोरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *