भारत-चीन तणाव; पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

नवी दिल्ली : लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान तणाव सुरू आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, संरक्षण प्रमुख (Chief of Defence Staff) जनरल बिपिन रावत तसंच तीन्ही सेनादल प्रमुखांची एक बैठक बोलावली.

उद्यापासून सेना कमांडर्सची तीन दिवसीय बैठक

दरम्यान, या तणावादरम्यान बुधवारपासून दिल्लीत लष्कराच्या सर्व कमांडर्सची तीन दिवसांच्या कॉन्फरन्सला सुरूवात होतेय. २७ मे ते २९ मेपर्यंत साऊथ ब्लॉकमध्ये ही कॉन्फरन्स पार पडेल. प्रत्येक वर्षी दोन वेळा अशी कॉन्फरन्स आयोजित केली होती. एप्रिल महिन्यात होणारी ही कॉन्फरन्स करोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र सचिवांचीही भेट घेतली होती. तसंच सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तीनही सेना प्रमुखांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. सिक्कीम आणि लडाख भागात भारतीय सैनिक आणि चीनी सैनिकांमध्ये तणावाची परिस्थिती असताना या बैठका घेण्यात येत आहेत.
पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) अनेक क्षेत्रात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान अद्यापही तणावाची परिस्थिती कायम आहे. २०१७ च्या डोकलाम तणावानंतर पुन्हा एकदा ताण वाढवणाऱ्या या घटना समोर येत आहेत.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं पॅन्गॉन्ग सरोवर आणि गलवान खोऱ्यात आपली पकड मजबूत केलीय. या दोन्ही वादग्रस्त क्षेत्रात चीनी सैनिकांनी आपल्या बाजून जवळपास अडीच हजार सैनिक तैनात केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *