बेताल वक्तव्य / शरद पवारांवरील वक्तव्य भोवलं, गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

बारामती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका करणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांना चांगलंच भोवलं आहे. त्यांच्या या टीकेविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आता बारामतीमध्ये गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार पडळकर हे बुधवारी पंढरपूर येथे आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धनगर आरक्षणाचे फक्त राजकारण करावयाचे आहे. त्यामुळे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत, असे बेताल विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली असून ती पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे अजेंडा नाही, भूमिका नाही आणि व्हिजनदेखील नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकावयाचे, त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि त्यांच्यावरतीच पुन्हा अन्याय करण्याची नेहमी भूमिका राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान पडळकरांच्या या वक्तव्याचा अनेकांनी विरोध केला आहे. अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने तर आंदोलनाला सुरूवात केली आहे. यासोबतच अकोल्यात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी दिल्या पडळकर मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या आहे. यासोबतच पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *