
नवी दिल्ली : भारताचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देश फ्रान्सने जाहीरपणे भारताला पाठिंबा दिला आहे. चीनसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला फ्रान्सच्या रुपाने पहिल्यांदाच एखाद्या देशाकडून सैन्यबळाचा पाठिंबा मिळाला आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांबद्दल दुःख व्यक्त केलं आणि आपण लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं.
गलवान खोऱ्यातील हल्ला हा सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण देशासाठी मोठा धक्का होता. या कठीण काळात आमच्या सहवेदना भारतासोबत आहेत. मित्र म्हणून भारतासाठी सैन्यबळासह सर्व प्रकारचं सहकार्य फ्रान्सकडून केलं जाईल. माझ्या सहवेदना संपूर्ण भारतीय सैन्याला आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना कळवाव्या, असं फ्लोरेन्स पार्ली म्हणाल्या.
फ्रान्सकडून भारत राफेलसारखी शक्तीशाली लढाऊ विमाने घेत आहे. यासोबतच फ्रान्स भारताचा एक महत्त्वाचा शस्त्र पुरवठादार देश आहे. राफेलपासून ते स्कोर्पिन सबमरिनपर्यंतचा ताफा फ्रान्सने पुरवला आहे. फ्रान्सकडून आता भारत दौऱ्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. करोना संकटानंतर दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये ही पहिलीच प्रस्तावित भेट आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गेल्या महिन्यातच रशियाला गेले होते आणि मॉस्कोमध्ये त्यांनी भारताला शस्त्र पुरवठा प्रस्तावित वेळेच्या अगोदरच करावा यासाठी विनंतीही केली.