भारताने पहिल्यांदाच हाँगकाँगबाबत भाष्य केले आहे. आजपर्यंत भारताने यावर चकार शब्दही काढला नव्हता. जिनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये (यूएनएचआरसी) भारताने सांगितले की हाँगकाँगमध्ये स्पेशल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रिजन बनविणे चीनचा घरगुती प्रश्न आहे. मात्र, भारत तेथील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये हाँगकाँगबाबत चिंता व्यक्त करणारी वक्तव्ये ऐकली आहेत. आम्हाला आशा आहे की, संबंधित पक्ष या गोष्टींची काळजी घेतील आणि यावर योग्य, निष्पक्ष तोडगा काढतील, असे संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी सदस्य राजीव चंदर यांनी म्हटले आहे.

भारताने हे भाष्य मानवाधिकार स्थितीवर होणा-या चचेर्वेळी केले. याआधी कधीही भारताने हाँगकाँगच्या मुद्द्यावर भाष्य केले नव्हते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने केलेले अतिक्रमण आणि गेल्या महिन्यात गलवान घाटीमध्ये २० जवानांना आलेले हौतात्म्य यानंतर ही प्रतिक्रिया भारताकडून आलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लडाखमध्ये चीनसोबत तणावाचे वातावरण आहे.