कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने ठेवला देशासमोर आदर्श ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई परिसरात सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधेचे कायमस्वरुपी रुग्णालय तयार करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई -कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती केली आहे. ऑक्सिजन  तसेच आयसीयू देखील उभारले आहेत. ही सुविधा तात्पुरती असली तरी आता पुढच पाऊल म्हणून मुंबई आणि परिसरासाठी सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा असलेले कायमस्वरुपी रुग्णालय तयार करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहीसर येथे, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून  नमन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील १२० खाटांचे आयसीयू अशा ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईेचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशी मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयु सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने देशासमोर ठेवली आहे. ह्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयां इतकीच भक्कमपणे झाली आहे. यासर्व सोयी अवाक करणाऱ्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना बरोबरच युद्ध आपण नक्कीच जिंकू मात्र भविष्यातही अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालय उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोना उपचारासाठी जंबो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यामध्ये देशातील पहिले राज्य जेथे ६० टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा,आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. या जंबो उपचार सुविधांच्या माध्यमातून लोकांना जीवनदान देतानाच जगाला दिशा देण्याचं कामही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांच्या उपचार सुविधांची निर्मिती करताना महाराष्ट्राने देशासमोर आदर्श उभा केला आहे. ज्याप्रकारे उपाययोजना हाती घेतल्या आहेत ते पाहता कोरोनावर विजय मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयातील आयसीयु सुविधा कार्यान्वित झाली असून उद्यापासून तेथे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. याठिकाणच्या आयसीयु विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी  खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा घेण्यात घेण्यात येणार आहे, हा देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.

मुलुंड येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा ऑक्सिजन सोयींयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. याठिकाणच्या ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९५५ खाटांचे रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी १०८ खाटांचे आयसीयु उभारण्यात आले आहे. या रुग्णालयातील २०० खाटा मीरा-भाईंदर महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नमुन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांची क्षमता असलेले कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.

राज्याची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आगेकूच

डेटा सेंटर्सच्या उभारणीला अधिक प्रोत्साहन देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई –  हिरानंदानी ग्रुपने बदलत्या काळाची पाऊले ओळखून मुंबईनजीक आशियातले सर्वात मोठे डेटा सेंटर उभारल्याने निश्चितच राज्याला याचा फायदा होईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली आगेकूच अशीच व्हावी. डाटाचे महत्व लक्षात घेऊन पुढील काळात सुद्धा राज्य शासन विशेषत: डाटा सेंटर्सना प्रोत्साहन देईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज पनवेल येथील ६०० एकर हिरानंदानी फोर्च्युन सिटीमध्ये ८.२ लाख स्क्वेफूट जागेवर उभारलेल्या योट्टा डेटा सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन करीत होते. यावेळी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद, उद्योगमंत्री सुभाष देसाई हेही सहभागी झाले होते.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने डेटावर आधारित अर्थव्यवस्थेला प्राधान्य द्यायचे ठरविले आहे. त्यादृष्टीने राज्यात डेटा सेन्टर्स उभारण्याला प्राधान्य देत आहोत. या स्टेट ऑफ दि आर्ट डेटा सेन्टर्समुळे जागतिक स्तरावरही महाराष्ट्राची छाप पडणार आहे. मुळातच डेटा सेन्टर्स गुंतवणुकीस उत्तेजन देतात तसेच त्यांचे आयुष्यही मोठे असते. त्यांचा दीर्घकालीन फायदा राज्यातील अभियांत्रिकी, बांधकाम उद्योगाला विशेषत: जागतिक स्तरावरील सेवा देतांना होतो.  महाजॉब्स पोर्टलची सुरुवात करून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची गरज असते. उद्योगांची गरज आणि नोकरी इच्छुक व्यक्ती यांची सांगड घालणारे महाजॉब्स हे एक वैशिष्ट्यपूर्ण पोर्टल आहे. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज च्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जाईल. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जाईल. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज कोरोनाशी आम्ही लढतो आहोत तेव्हा तंत्रज्ञान आमच्या खूप मदतीला येतेय. टेलीमेडिसिन असो, टेलीआयसीयू किंवा आमच्या वरळी येथील कोविड केंद्रावर तर रोबो हे डॉक्टरांना मदत करीत आहेत. केंद्र सरकारचे मोबाईल एप आरोग्य सेतू, किंवा रुग्णांसाठी बेड्सची रिअल टाईम माहिती देणारे आमचे डॅशबोर्ड असो किंवा वैद्यकीय उपकरणे असोत. आताच्या युगातले हे तंत्रज्ञान जीवन देणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे आहे. मुंबईत कशा रीतीने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 

सध्याच्या या कोविड परिस्थितीत दाता आणि डाटा या दोघांनाही खूप महत्व आले आहे असेही  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की आमचे सरकार येण्यापूर्वी केवळ २ मोबाईल कंपन्या देशात होत्या ,आता २६० कंपन्या आहेत. इंत्र्नेत वापर जगाच्या तुलनेत २० टक्के असला तरी डेटा उपयोग केवळ २ टक्के आहे. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धीमत्ता, मोबाईल इकॉनॉमी , डेटा व्यवस्थापन, डेटा साठवणूक आणि सुरक्षा याला प्रचंड महत्व येणार आहे. डेटा संरक्षण कायदाही आपण मंजूर केला आहे अशी माहिती त्यांनी दिली. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दर्शन हिरानंदानी यांनी प्रास्ताविक करून या डेटा सेंटरची माहिती दिली. हिरानंदानी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ निरंजन हिरानंदानी व योट्टा इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गुप्ता यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *