परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम; एप्रिलमध्येच निर्णय का नाही घेतला? युजीसीला सवाल

राज्यात करोनामुळे परिस्थिती अजूनही चिंताजनक अवस्थेत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्यानं लॉकडाउनची कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे विद्यापीठातील परीक्षांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं (युजीसी) सुधारित नियमांनुसार विद्यापीठं व उच्च शिक्षण संस्थांनी सप्टेंबर अखरेपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्याच भूमिकेत असून, तसे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

युजीसीने करोना काळात परीक्षा घेण्यासंदर्भात नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नव्या सूचनाबद्दल उदय सामंत यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना भाष्य केलं. उदय सामंत म्हणाले,”राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्या बैठकीत राज्यात परीक्षा घेऊ नयेत, असा निर्णय झाला होता. आधी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर युजीसीनं एप्रिल महिन्यात परिपत्रक प्रसिद्ध केलं. आपापल्या राज्यातील करोनाची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यात करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीनं व्यावसायिक व अव्यावसायिक दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता,” अशी माहिती सावंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *