देशात २४ तासांत २८,६३७ नवे रुग्ण, तर ५५१ बळी अमेरिकेत एका दिवसात ७० हजाराहून अधिक रुग्ण

मुंबई (प्रतिनिधी) : देशात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची होणारी वाढ पाहाता चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे. मागील आठ दिवसांपासून देशात प्रत्येक तासांला एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

आठ दिवसांत देशात दोन लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. उपचार घेणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २८ हजार सहाशे ३७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर ५५१ कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे.

दरम्यान, जगात अमेरिका हा देश कोरोना संकटाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ७० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोणत्याही देशात २४ तासात झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत आतापर्यंत ३१,८३,८५६ लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत.

रविवारी सकाळ पर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाख ४९ हजार ५५३ इतकी झाली आहे. पाच लाख ३४ हजरा ६२१ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर दोन लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत २२ हजार ६७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत, कोरोनामुक्त होणा-यांची संख्या जास्त आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२.७८ टक्क्यांवर पोहचले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

पाच हजारांपेक्षा जास्त मृत्यू एकट्या मुंबईत

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि सोलापुर या शहरांमध्ये करानोचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. गेल्या २४ तासांत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ८१३९ कोरोनारुग्ण नोंदले गेले. लॉकडाऊनसारखे कठोर उपाय योजूनही राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात दिवसभरात २२३ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत १० हजार ११६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ११६ दिवसांत राज्यात दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांचा बळी गेला आहे. यातील पाच हजारांपेक्षा जास्त मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत.

दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ताज्या माहितीनुसार, रुग्ण वाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, राज्यात पुणे आणि ठाण्यात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर केरळमधील थिरुवअनंतपुरम तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोना अधिक घातक, कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार घातला आहे. भारतही घातक कोरोना व्हायरसचा सामना करत आहे. मात्र अशातच शनिवारी आलेले आकडे देशाच्या दृष्टीने भीती वाढवणारे आहेत. या आकड्यांचा विचार करता, नव्या कोरोना रुग्णांच्या बाततीत जागतिक पातळीवर भारतचा शेअर वाढला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढणे ही आधिपासूनच धोक्याची घटना आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात शनिवारी २२३ जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर महाराष्ट्रातील मृतांच्या आकड्याने १० हजारचा टप्पाही ओलांडला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या मृतांपैकी ४५ टक्के मृत्यू केवळ महाराष्ट्रात झाले आहेत.

अमेरिकेत पुन्हा विक्रमी वाढ

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जगभरात आतापर्यंत १,२४,६१,९६२ लोकांना प्राणघातक कोरोनाची लागण झाली आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत जगात ५,५९,४८१ लोकांनी प्राण गमावले आहेत. ब्रिटनमधील आता वेगवेगळ्या देशांमधून येणा-या लोकांना दोन आठवडे क्वारंटाईन राहावे लागणार नाही. शुक्रवारपासून प्रवाशांना हा दिलासा मिळाला आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, ७५ देश आणि ब्रिटिश परदेशी भागातून आलेल्या लोकांसाठी नियम शिथिल केले जात आहेत.

डब्ल्यूएचओची टीम वुहानमध्ये दाखल

जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) दोन तज्ज्ञ पुढील दोन दिवस कोरोनाच्या जागतिक साथीच्या उद्दीष्टांचा शोध घेण्यासाठी मुख्य मोहिमेचा भाग म्हणून चीनची राजधानी बीजिंगमध्ये राहतील. संयुक्त राष्ट्रांनी असे म्हटले आहे की, प्राणी रोग तज्ज्ञ आणि एक महामारी रोग तज्ज्ञ हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यांपर्यंत कसा पसरला याचा शोध घेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *