धक्कादायक; बच्चन कुटुंबातील चौघांना करोना; चारही बंगले तडकाफडकी सील

मुंबई: महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने अमिताभ यांच्या चारही बंगल्यांना आज तडकाफडकी सील करण्यात आले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. तसेच अमिताभ यांच्या बंगल्यातील ३० कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोघांमध्येही करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आज सकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जुहू येथे जाऊन अमिताभ यांच्या जनक, प्रतिक्षा, वत्सा आणि जलसा या चारही बंगल्यांचं सॅनिटायझेशन केलं. सुमारे तीन तास हे काम चाललं. त्यानंतर आज दुपारी बच्चन कुटुंबातील आणखी काही जणांच्या करोनाचे रिपोर्ट आले. त्यात ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांनी मुलगी आराध्या बच्चन यांनाही करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तर श्वेता नंदा, अगस्त्या नंदा, नव्या नवेली आणि जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अमिताभ यांचे हे चारही बंगले सील करण्यात आले आहेत. महापालिकेने सकाळीच हे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अमिताभ यांनी त्यांना करोना झाल्याची माहिती ट्विट करून दिली होती. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने संबंधित यंत्रणांना याबाबत कळवलं आहे. घरातील अन्य सदस्य आणि स्टाफचे स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा करोना चाचणी अहवाल अजून आलेला नाही. त्याची प्रतीक्षा आहे’, असे नमूद करतानाच अमिताभ यांनी संपर्कातील अन्य व्यक्तींनाही आवाहन केलं होतं. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती अमिताभ यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *