सोयगाव तालुक्यात दोन अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या आत्महत्या

पुण्यप्रताप न्युज नेटवर्क

सोयगाव – सोयगाव तालुक्यात दोन दिवसात तब्बल दोन शेतकर्‍यांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून जीवनयात्रा संपविल्याच्या घटना रविवारी उघडकीस आल्या असून यामुळे सोयगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पळाशीतांडा, आणि पहुरी या दोन गावांमध्ये दोघा अल्पभूधारक तरुण शेतकर्‍यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या असून पळाशीतांडा येथील चाळीस वर्षीय शेतकर्‍याने शेतातच विषारी औषध प्राशन केले असून पहुरी ता.सोयगाव येथील 24 वर्षीय शेतकर्‍याने कर्जाच्या ओझ्याला कंटाळून घरातच गळफास घेतल्याचे रविवारी उघड झाले आहे.
रघुनाथ मखराम चव्हाण (वय 40 पळाशीतांडा) आणि सुदाम शांताराम मगर (वय 24 पहुरी) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे असून पळाशीतांडा येथील शेतकर्‍याला तातडीने उपचारासाठी पाचोरा जि. जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाचोरा जि. जळगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृतुयची नोंद करण्यात आली आहे. पहुरी ता. सोयगाव येथील शेतकर्‍याने घरातच गळफास घेवून आत्महत्या केली असून या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुदाम मगर या तरुण शेतकर्‍यांच्या नावावर वाकडी ता. सोयगाव येथील शिवारात गट क्र 64 मध्ये 2 एकर शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी हा शेतकरी सक्षम नसल्याने त्याने घरातच गळफास घेवून जीवन संपविले आहे. या प्रकरणी सोयगाव महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या दोघांकडे खासगी आणि बँका असे मिळून पाच लाखाच्यावर कर्ज होते त्या कर्जाच्या फेड करण्याच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्या आहे. पळाशीतांड्यातील शेतकर्‍याच्या मृत्यू प्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.तर पहुरीच्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *