मुंबईत ७० टक्के रुग्णांची करोनावर मात; व्हेंटिलेटर पडू लागले ओस!

मुंबई: मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहचलं आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जवळपास नवीन बाधित रुग्णांइतकेच रुग्ण दररोज करोनावर मात करून घरी परतत आहेत. त्यातच मुंबई पालिकेने आज मुंबईतील करोना संसर्गाबाबत सद्यस्थिती सांगितली असून हे आकडे फारच बोलके व करोनाची भीती कमी करणारे आहेत. ( Coronavirus In Mumbai )

मुंबईतील विविध कोविड हॉस्पिटल्समध्ये सध्या १०५३ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. विशेष म्हणजे यापैकी १२५ व्हेंटिलेटर सध्या विनावापर आहेत. म्हणजेच व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली असून हे चांगले संकेत आहेत व मुंबईतील करोना संसर्गाचा धोका वेगाने कमी होत असल्याचेच यावरून दिसत असल्याचे मुंबई पालिकेने म्हटले आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्या हे प्रमाण वाढून ७० टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्याचाच अर्थ पालिका हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्याचेही पालिकेने नमूद केले आहे.

मुंबई पालिकेला आतापर्यंत केंद्र सरकारकडून ४४६ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. पीएम केअर फंडातून हे व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने मिळाले. मुंबई पालिकेच्या विविध रुग्णालयांत आवश्यकतेनुसार हे व्हेंटिलेटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत, असेही पालिकेने सांगितले.

धारावीत फक्त ९९ अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा पावणेतील लाखांच्या दिशेने सरकला आहे. मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार हा आकडा २ लाख ६७ हजार ६६५ इतका होता. मंगळवारी दिवसभरात ६ हजार ७४१ नवीन रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा करोनासाठी हॉटस्पॉट बनला असताना मुंबईत मात्र रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईत मंगळवारी करोनाचे ९५४ नवे रुग्ण आढळले होते तर १०११ रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ९५ हजार १०० झाली असली तरी त्यात अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २२ हजार ८२८ इतकी आहे. मुंबईत आतापर्यंत ६६ हजार ६३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईच्या करोना विरोधी लढ्यात धारावीने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. धारावीत करोना साथ नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. धारावीत गेल्या २४ तासांत २३ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २४१५ इतकी झाली आहे. त्यात फक्त ९९ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे पालिकेने आजच्या आकडेवारीत नमूद केले.

Previous post राज्याचा बारावीचा निकाल उद्या ऑनलाइन होणार जाहीर
Next post जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पोहोचले 61 टक्क्यांवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *