राज्यात करोनाचा कहर सुरू असताना नगरने दिली खूषखबर

नगर-नगर जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. काल १२६ जणांनी करोनावर मात केल्यानंतर आज पुन्हा १०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार २५ झाली आहे. तर, सध्याच्या परिस्थितीला हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या करोना बाधितांची संख्या ५१६ इतकी आहे. बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.
नगरमध्ये करोना रुग्ण वाढत असले तरी दिलासादायक बाब म्हणजे या आजारातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. आज जिल्ह्यातील १०५ रुग्णांनी करोनावर मात केल्याचे आरोग्य विभाग जाहीर केले आहे. या सर्वांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २५ एवढी झाली आहे. आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये नगर शहरातील ३८, नगर तालुका भागातील ३, पारनेर तालुक्यातील १०, राहता ८, पाथर्डी ६, भिंगार ६, राहुरी १, संगमनेर ६, श्रीगोंदा २, श्रीरामपूर येथील २२, आणि नेवासा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.
दुसरीकडे आज सकाळी नगर जिल्ह्यामध्ये करोनाचे आणखी आठ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील एक आणि श्रीगोंदा तालुक्यातील सात जणांचा समावेश आहे. या सर्वांची तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये करण्यात आली होती. त्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या ५१६ एवढे आहे. मात्र सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण करोनामुक्त झाल्यामुळे हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासकीय यंत्रणांना येत असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा लॉकडाउन करण्याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्ये ही मतभेद आहेत. दरम्यान, शिर्डीत करोनानं आज पहिला बळी घेतला असून तेथील रुग्णांची संख्या ४४ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *