करोना: रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत धडक कारवाई

मुंबई: करोना रुग्णांवरील (Covid 19) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर(Remdesivir) इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं पर्दाफाश केला आहे. ५४०० रुपये किंमतीचं हे इंजेक्शन काळ्याबाजारात ३० हजार रुपयांहून अधिक किंमतीला विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. चढ्या किंमतीनं इंजेक्शनची विक्री करणाऱ्या या टोळीचा मुंबई पोलिसांची (Mumbai Police) गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पर्दाफाश केला. बोगस ग्राहक बनून सापळा रचला आणि हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली. मुलुंड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपी हे मुंबई व ठाण्यातील आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश केमिस्ट आणि औषध कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. ५४०० किंमतीचे हे इंजेक्शन ३० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीला काळ्याबाजारात विकत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. या टोळीकडून १२ रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
राज्यात करोनावरील रेमडेसीवीर या औषधाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू झाला आहे. याची दखल राज्य सरकारनंही घेतली होती. काळाबाजार रोखण्यासाठी रेमडेसीवीर औषध घेण्याकरिता आधारकार्ड सक्तीचं करण्यात आलं होतं. रेमडेसीवीर औषधासाठी रुग्णांना आधारकार्ड दाखविणे बंधनकारक करण्यात आलेले होते. ज्या रुग्णांना रेमडेसीवीर औषधाचा डोस देण्यात आला आहे, त्या रुग्णांची नोंद त्यांच्या आधारकार्डसह ठेवणंही रुग्णालयांना बंधनकारक करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे औषध घेण्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहितीही कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *