काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल; शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा

सोलापूरः अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटायला लागले आहेत. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं करोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल. असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे. ते आज करोनाच्या संसर्गाच्या वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

करोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, याबाबत मला माहिती नाही, राज्य आणि केंद्र सराकारनं लोकांना करोना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *