भारत चीन तणाव : नौसेना सीमेवर ‘मिग २९ के’ तैनात करणार!

नवी दिल्ली : चिनी सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाख भागात भारतीय नौसेनेचे P-8I हे टेहाळणी करणारी विमानं सतत उड्डाण भरत आहेत. आता ‘समुद्रीयोद्धा’ म्हणून ओळखलं जाणारं ‘मिग-२९ के’ हे लढाऊ विमान या कामासाठी वापरलं जाणार आहे. नौसेनेच्या या लढाऊ विमानांना वायुसेनेच्या वेगवेगळ्या बेसवर तैनात करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश आणि संरक्षण प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेनेच्या तीनही अंगांना – भारतीय लष्कर, नौसेना आणि वायसेनला आपांपसात समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. तसंच संरक्षण प्रमुखांना देशाच्या उत्तर किंवा पश्चिम सीमांवर वायुसेनेसोबतच नौसेनेच्या लढाऊ विमानांना तैनात करण्याचे निर्देश दिले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मिग २९ के फायटर एअरक्राफ्ट नॉर्दन सेक्टरमध्ये एअरफोर्सच्या बेसवर तैनात करण्याची योजना बनवण्यात आलीय. या लढाऊ विमानांचा वापर पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेजवळ ‘ऑपरेशनल फ्लाईंग’साठी केला जाणार आहे.

भारतीय नौसेना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान एलएसीवर नजर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सीमेजवळ चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम यानिमित्तानं नौसेनेची ही विमानं करणार आहेत. २०१७ मध्ये डोकलाममध्ये झालेल्या वादानंतरही नौसेच्या विमानांचा योग्य पद्धतीनं वापर करण्यात आला होता.

भारतीय नौसेनेकडे ४० हून अधिक मिग २९ के लढाऊ विमानं आहेत. विमानवाहक युद्धनौका ‘आयएनएस विक्रमादित्य’वर ही विमानं सध्या तैनात आहेत. गोव्यात नौसेनेनं तयार केलेल्या फायटर बेस ‘आयएनएस हंस’हून ही विमानं नियमित उड्डाण भरतात. जवळपास दशकभरापूर्वी भारतीय नौसेनेनं ही विमानं रशियाकडून खरेदी केली होती.

दरम्यान, भारतीय नौसेना मलक्का स्ट्रेटस् (Malacca Straits) जवळ युद्धाभ्यासात व्यग्र आहे. याच भागातून चिनी नौसेना हिंद महासागरात प्रवेश करतात. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, नौसेनेच्या पश्चिम कमांडच्या युद्धनौका आणि समुद्री जहाज अंदमान आणि निकोबर बेट परिसरात युद्धाभ्यास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आयएनएस चक्र आणि आयएनएस अरिहंतसहीत नौसेनेच्या इतर पानबुड्याही सक्रीय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *