ऑक्सफर्डच्या करोना लसीचे मुंबई-पुण्यात मानव परीक्षण; ‘या’ महिन्यात मिळणार गुड न्यूज!

मुंबई: ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाच्या करोनावरील लसीची भारतात लवकरच ट्रायल सुरू होणार आहे. ऑगस्टपासून मुंबई-पुण्यात या लसीचे मानव परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉटमधून ४ हजार ते ५ हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. हे परीक्षण यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी जूनपर्यंत ही लस बाजारात आणल्या जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाला या लसीचे यशस्वी परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये ही लस रुग्णांसाठी वापरली जात आहे. भारतातही ही लस येणार असून त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट या लसीचं परीक्षण करणार आहे. पुण्यात कालपर्यंत करोना रुग्णांची संख्या ५९ हजारांवर पोहोचली आहे. तर मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा एक लाखावर गेला आहे. महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक रुग्ण या दोन शहरांमधील आहेत.

मुंबई आणि पुण्यात या लसीचं मानवी परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही अनेक ठिकाणांचा शोध घेतला आहे. या दोन शहरात करोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे या लसीचे परिणाम जाणून घेण्यास अधिक मदत होईल, असं एसाआयआयचे सीईओ अदार पुनावाला यांनी सांगितलं. भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांची परवानगी मिळाल्यानंतर या लसीच्या फेज-३ची ट्रायल सुरू करण्यात येईल. त्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आम्ही दोन दिवसात अर्ज करणार आहोत. एक दोन आठवड्यात आम्हाला परवानगी मिळेल अशी आशा आहे. त्यानंतर तीन आठवडे व्हेंटिलेटर्स रुग्णालयात आणायला लागतील. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यात ही ट्रायल सुरू होईल, असं पुनावाला यांनी सांगितलं.

हे परीक्षण यशस्वी ठरल्यास कंपनी वर्ष अखेर पर्यंत ३० ते ४० कोटी डोस तयार करेल. अॅस्ट्रॉजनेक सोबत झालेल्या करारानुसार एसआयआय भारत आणि इतर ७० गरीब देशांसाठी १ अब्ज लस तयार करू शकेल, असं पुनावाला यांनी सांगितलं. एसआयआयने भारतात १ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ही लस विकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असं कंपनीचे चेअरमन सायरस पुनावाला यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *