जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग-जयंत पाटील

मुंबई – येत्या काळात जलसंपदा विभागाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग करू असे सांगतानाच
आपल्या नगरभागात कुकडीसारखे मोठे प्रकल्प असून प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना कसा दिलासा देता येईल त्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुरू असलेल्या कामाबाबत आढावा घेण्यासाठी आज दक्षिण अहमदनगरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिवाय या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले गेले.
संकट मोठे आहे म्हणून या संकटात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटणे गरजेचे आहे. सामान्य जनतेला या काळात आणखी मदत कशी करता येईल हे पदाधिकाऱ्यांना सांगणे गरजेचे आहे म्हणून ही बैठक आयोजित केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
या संकटाच्या काळात नगरमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी लॉकडाऊनच्या काळात २७ हजार लोकांना अत्यावश्यक साहित्याचे कीट दिले. भुकेल्यांना अन्न धान्य देण्याचे काम केल्याबाबत संग्राम जगताप यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले.
रुग्णांचे आकडे वाढत आहे मात्र तब्येतीत सुधारणा होऊन घरी परतणाऱ्यांची संख्याही जास्त आहे ही एक सकारात्मक बाब आहे. या संकटामुळे उद्योग, विकासकामे सर्व गोष्टींना कात्रण लागत आहे. मात्र सरकार सर्व संकटावर सर्वोतोपरीने मात करण्याचा प्रयत्न करत आहे असा दिलासाही दिला.
राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय या मोहिमेतंर्गत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सुचना आपण मागवल्या होत्या. सर्वांनी मोठा प्रतिसाद या मोहिमेला प्रतिसाद दिला. पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या सुचना आल्या आहेत. जनतेच्या भल्यासाठी नक्कीच आपण या सर्व सुचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करू असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष माणिकराव विधाते, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळंबकर, मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, निलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *