
जळगाव: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरल्याप्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांचा शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला आहे. जळगाव येथे त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले, तर चाळीसगाव येथे महाविकास आघाडीतर्फे त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ‘रिकामटेकडा मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला. चाळीसगाव येथे दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलतांना त्यांनी हा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना संतप्त झाली आहे. आमदार चव्हाण निषेध करण्यात आला आहे.
जळगाव येथे आज शिवसेना कार्यालयाजवळ शहर शिवसेनेतर्फे आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले , तसेच जोडे मारण्यात आले. यावेळी शहर प्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी माजी महापौर नगरसेवक विष्णू भंगाळे, शहर संघटक दिनेश जगताप,गणेश गायकवाड, विजय बांदल , शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मनीषा पाटील आदि उपस्थित होते.
चाळीसगाव येथे महाविकास आघाडीर्फे मोर्चा
चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या निषेधार्थ आज शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. घाटरोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते तहसीलदार कार्यालयापर्यत हा मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. आमदार चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख गुलाबराव वाघ, चाळीसगाव शिवसेना प्रमुख रमेश चव्हाण, यांनी मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी जिल्हा उपप्रमुख आर.एल.पाटील, दिलीप घोरपडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, श्याम देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. मंगेश चव्हाण याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
काय म्हणाले आ. मंगेश चव्हाण
मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला एक मिनीटही फुरसत नसते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे भरपूर वेळ आहे. ते मुंबई ते पुणे अडीच तासाचा प्रवास स्वत:गाडी चालवून करीत असतात. एवढा रिकामाटेकडा मुख्यमंत्री इतिहासात पहावयास मिळाला नाही. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव येथील भाजपचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रथमच यावेळी चाळीसगाव मतदार संघातून उमेदवारी दिली.व ते अल्प मतांनी विजयी झाले. फक्त एकतीस वर्षे वयाचे ते तरूण आमदार आहेत.