मुंबई – दहावीच्या निकालानंतर राज्याच्या शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात केली. पण, वेबसाइट सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाउनच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी काही पालकांनी केल्या आहेत. अर्ज भरताना संकेतस्थळ कासवगतीने सुरू होते असे काही पालकांचे म्हणणे आहे. अनेकदा प्रयत्न केल्यानंतरच यशस्वीपणे लॉग-इन होत असल्याची तक्रार काही विद्यार्थी-पालकांनी जणांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई एमएमआर क्षेत्र आणि राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील तब्बल १ हजार ६०० कॉलेजांमधील तब्बल साडे पाच लाख जागासाठीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना घरबसल्या करता यावी यासाठी संकेतस्थळात यंदा काही बदल करण्यात आले आहेत. अर्जाचा पहिला भाग भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, माहिती भरून अर्ज लॉक करणे, महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम भरणे, प्रवेश निश्चित करणे या प्रकारच्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना पार पाडता येतील. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना माहितीपुस्तकेही ऑनलाइन मिळणार असून त्याचे शुल्कही कमी करण्यात आहे. यंदा २२५ रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना माहितीपुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार. माहितीपुस्तकात महाविद्यालयांसंबंधात तसेच, प्रवेश प्रक्रियेचे टप्पे, नियम, प्रक्रिया कशी करावी, अर्ज, महाविद्यालयांचे पात्रता गुण (कट ऑफ) आदी माहिती मिळणार आहे.