राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक (सीआयडी) असल्याचा बहाणा करून गंडा घालणाऱ्या युवतीला व तिच्या मामाला भुदरगड पोलिसांनी सोमवारी अटक केली. प्रियांका प्रकाश चव्हाण (वय २२ रा. गारगोटी) व विठ्ठल मारुती नीलवर्ण (वय ३८, रा. निळपण) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी अनेक युवक-युवतींना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे.
प्रियंका हिने गारगोटी परिसरात आपण राज्य अन्वेषण विभागात पोलीस निरीक्षक असल्याचे फलक लावले होते. त्यावेळी तिचे अनेक ठिकाणी सत्कारही झाले होते. तिने आपली राज्य अन्वेषण पोलीस निरीक्षक असल्याची प्रतिमा पद्धतशीरपणे तयारी केली होती. त्यामुळे तिच्या बोलण्यावर लोक भाळले होते. तिने अनेक बेरोजगार युवक-युवतींना राज्य अन्वेषण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये जमा केले होते.