
पाटणा: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्यात आली आहे. सुशांतसिंहचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली. या नंतर राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस
जनता दला (संयुक्त) नेते संजय सिंह यांनी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केल्याची माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिस सक्षम होते, मात्र महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना काम करू दिले नाही, असेही संजय सिंह म्हणाले. आता सीबीआय चौकशी झाल्यानंत या प्रकरणात दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य पुढे येईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होण्यासाठी त्यासंबंधीची कारवाई लवकर सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांना यापूर्वीच दिले आहेत. दरम्यानच्या काळात सुशांतसिंह राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांनी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याशी चर्चा केली. या सर्व प्रक्रियेनंतर बिहार सरकारकडून या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती सीबीआयला करण्यात आली.
सुशांतच्या वडिलांनी केली मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा
सुशांतसिंह राजपूत याचे वडील के. के. सिंह यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी सिंह यांनी नीतीश कुमार यांच्याकडे केली. यानंतरच बिहार सरकारने या प्रकरणाचा सीबीआय तपास करण्याचा निर्णय घेतला.
विरोधी पक्षांनीही केली सीबीआय चौकशीची मागणी
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी बिहारचे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकाच मंचावर आलेले दिसले. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनीही मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.