नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत फोर्ज कंपनीच्या सहकार्याने बनवत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांची प्रक्रिया स्वातंत्र्य दिनाच्या आधी संपविण्याचे लक्ष्य इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल या संस्थेने ठेवले असले तरी ते पूर्ण होणे शक्य नाही. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला नसल्याचे एम्सने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लस विकसित केल्याची घोषणा स्वातंत्र्य दिनी होण्याची शक्यता कमी आहे.
या लसीच्या एम्स व अन्य ११ संस्थांमध्ये सुरू असलेल्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. दुसरा व तिसरा टप्पाही बाकी आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत तीनही टप्पे पूर्ण होणे शक्य नाही. त्याशिवाय झायडस कॅडिला कंपनी बनवत असलेल्या झायकोव्ह-डी लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला व दुसरा टप्पा पार पाडण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ व सिरम इन्स्टिट्यूट संयुक्तपणे बनवत असलेल्या लसीच्या मानवी चाचण्याही सुरू आहेत. मात्र वर्षाअखेरपर्यंत लस विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञांनी फेटाळली आहे.