भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते रक्तरंजित आणि अंतिम युद्ध असेल. पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर ते अणुयुद्ध होईल, असे शेख रशीद अहमद म्हणाले. तसेच, मुस्लिमांचे प्राण वाचवताना आमचे हत्यार त्या भागांना लक्ष्य करू शकते. पाकिस्तान आसामपर्यंत लक्ष्य करू शकते, अशी गरळ शेख रशीद अहमद यांनी ओकली आहे.

शेख रशीद अहमद यांनी पहिल्यांदाच ही धमकी दिली नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असे विधान केले आहे. याआधी शेख रशीद अहमद यांनी भारताचे नाव न घेता अणु युद्धाची धमकी दिली होती. आता युद्ध पारंपारिक मागार्ने होणार नाही, तर अणु युद्ध होईल, असे शेख रशीद अहमद म्हणाले होते. पाकिस्तानकडे १२५ ग्रॅम आणि २५० ग्रॅम वजनाची लक्ष्यभेदी अण्वस्त्रे आहेत, जी एका विशिष्ट लक्ष्यावर मारा करू शकतात, असेही शेख रशीद अहमद यांनी म्हटले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शेख रशीद अहमद यांनी नुकतेच अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरून सुद्धा विधान केले होते. भारत हा आता धर्मनिरपेक्ष देश नाही, तर तो धर्माचा देश बनला आहे, असे विधान शेख रशीद अहमद यांनी केले होते. त्यानंतर शेख रशीद अहमद यांच्या विधानावर भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दहशत पसरविणारा देश धार्मिक उन्माद वाढविण्यासारखीच विधाने करू शकतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते.