अनलॉक ४ : १ सप्टेंबरपासून या गोष्टींना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता

देशात पहिल्यांदा २४ मार्चपासून लॉकडाऊन जारी करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या वेगवेगळ्या टप्प्यांत अनेक गोष्टींना सीमित परवानगीही देण्यात आलीय. धोका संपूर्णरित्या टळला नसला तरी काळजी बाळगता कामं सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (Unlock 4) भारत पोहचला आहे. १ सप्टेंबरपासून भारतात अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ७ लाख ५२ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत देशात २६ लाख ४८ हजार ९९८ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर देशात आत्तापर्यंत ६२,५५० रुग्णांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. देशभरात आत्तापर्यंत करोनाच्या विळख्यात अडकलेल्या एकूण संक्रमितांची संख्या ३५ लाखांच्या जवळपास पोहचलीय.

अशावेळी सावधानता बाळगूनच केंद्र तसंच राज्य सरकारला सोबत नागरिकांनाही पुढे वाटचाल करावी लागणार आहे. अनलॉक ४ साठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून येत्या एक दोन दिवसांत गाईडलाईन्स (Unlock 4 guidelines) जारी करण्यात येतील. काही गोष्टी सोडून बाकीच्या इतर सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. चेन्नईमध्ये आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ई-पास यापुढेही अनिवार्य राहणार आहे.

​मुंबई रेल्वे बंदच राहणार

मुंबईमध्ये लोकल रेल्वे आणखी काही काळ बंदच राहणार आहेत. विनाकारणास्तव रस्त्यावर फिरताना आढळले तर गाडी जप्त केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय. मास्क परिधान करणं अनिवार्य यापुढेही अनिवार्य राहील. याशिवाय खुल्या ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात आलीय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालनही गरजेचं आहे. गाईडलाईन्स पाळल्या गेल्या नाहीतर तर मोठा दंडही वसूल केला जाऊ शकतो.

​राजधानीत मेट्रो सुरू होण्याची शक्यता

बाहेर निघताना नागरिकांना मास्क परिधान करणं आवश्यक राहील. राज्य आपापल्या गरजेनुसार आणि संक्रमणानुसार, गाईडलाईन्समध्ये बदल करू शकतील. केंद्र सरकारकडून राजधानी दिल्लीत मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते. २२ मार्चपासून मेट्रो सेवा ठप्प आहे. येत्या १ सप्टेंबरपासून दिल्ली – एनसीआर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो सुरू झाली तर कॉन्टॅक्टलेस तिकीटिंग सिस्टम लागू केली जाण्याची शक्यता आहे तसंच टोकन्सही जारी केले जातील

​दारुविक्रीला परवानगी मिळण्याची शक्यता

दारुची दुकानांना आणि बारला ‘टेक अवे’ पद्धतीनं दारु विक्रीची परवानगी मिळू शकते. कर्नाटकमध्येही राज्य सरकारचा रेस्टॉरन्टमध्ये दारुविक्रीला परवानगी देण्याचा विचार सुरू आहे. पुढच्या महिन्यात पब आणि क्बलही उघडले जाऊ शकतात.

​विमानांच्या वाहतुकीला परवानगी?

१ सप्टेंबरपासून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद या सहा शहरांतून उड्डाण सेवा आठवड्यात तीन वेळा सुरू होऊ शकते. कोलकतामध्ये देशांतर्गत विमानांना उतरण्यासाठी परवानगी मिळू शकते. १ सप्टेंबरपासून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, चेन्नई आणि अहमदाबाद इथून अनेक विमानं कोलकाता विमानतळावर उतरू शकतील, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. मात्र, राज्यात विकेन्डसला लॉकडाऊन सुरूच राहणार आहे

​विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी…

देशाच्या भवितव्याच्या अर्थात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा आणि महाविद्यालय बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय. कर्नाटकात १ सप्टेंबरपासून पदवी महाविद्यालयांचे ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत. तर १ ऑक्टोबरपासून ऑफलाईन क्लासेस सुरू करण्याचाही राज्य सरकारचा विचार सुरू आहे.

​सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स

सिनेगृह आणि मल्टिप्लेक्स मात्र अद्याप उघडले जाणार नाहीत. सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांमुळे केवळ २५-३० टक्के सीट बुक होऊ शकतील. त्यामुळे तोटा होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात मात्र सिनेगृह उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

Previous post करोनावरील लस कधी येणार?; मुख्यमंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर
Next post सुशांत मृत्यू प्रकरण:प्रेम करणे गुन्हा असेल, तर रिया शिक्षा भोगण्यास तयार; रियाचे वकील सतिश मानशिंदे यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *