महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरपर्यंत ऑक्सिजन व आयसीयू बेड वाढविण्याचे केंद्राचे आदेश!

महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे केंद्र सरकार चिंतीत झाले आहे. केंद्र सरकारने यासाठी पुढील महिन्यात १३ ऑक्टोबरपर्यंत किती रुग्ण वाढतील याचा अंदाज बांधून राज्यातील रुग्णालयांत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलटरचे ७ हजार ३५५ बेड वाढविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पुढील महिन्यात वाढणारे रुग्ण लक्षात घेऊन पुरेशा बेडची व्यवस्था न केल्यास करोना रुग्णांचे बेड अभावी अतोनात हाल होतील तसेच मृत्यूंची संख्याही वाढेल अशी भीती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

राज्यात आगामी महिन्यात म्हणजे १३ ऑक्टोबरपर्यंत किती करोना रुग्ण वाढतील व त्यातुलनेत नेमक्या किती ऑक्सिजन बेडची, अतिदक्षता विभागातील बेड तसेच व्हेंटिलेटर लागतील याचा सखोल अभ्यास करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रात नेमकी किती अतिरिक्त बेडची व्यवस्था करायला हवी याबाबत स्पष्ट सूचना राज्य सरकारला केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आजघडीला असलेले करोना रुग्ण आणि १३ ऑक्टोबर रोजी असणारे रुग्ण यांचे गणितच केंद्र सरकारने मांडले आहे. हे गणित मांडताना आजघडीला राज्यात रोज होणाऱ्या चाचण्यांचा विचार करण्यात आला असून करोना चाचण्यांची संख्या वेगाने वाढविण्यासही केंद्राने यापूर्वीच सांगितले आहे. देशपातळीवरील अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रात चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी असून दहा लाख लोकांमागे रोज ३८३ चाचण्या करण्यात येत आहे. राज्यातील शासकीय करोना चाचणी प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने चाचण्या करत नसून यासाठी ठोस पावले टाकण्यास केंद्र सरकारने बजावले आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात रोज २० ते २४ हजाराने करोना रुग्णांची वाढ होत आहे. आजच्या दिवशी राज्यात १२ लाख ४७ हजार २८४ करोना रुग्णसंख्या असून आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात असलेल्या करोना रुग्णांची जिल्हावार आकडेवारी व रुग्णालयातील बेडची संख्या तसेच १३ ऑक्टोबर रोजी नेमके जिल्हावार किती रुग्णसंख्या असेल व त्यासाठी ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरचे किती बेड लागतील याची सुस्पष्ट कल्पना केंद्र सरकारने राज्याला दिली आहे.

बेड वाढवण्याच्या सूचना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारला पाठविलेल्या अहवालात नमूद केल्यानुसार १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात १० लाख ११ हजार ४०४ करोना रुग्ण होते. ते १३ ऑक्टोबर रोजी १६ लाख ९६ हजार ९९१ रुग्ण झालेले असतील. आजच्या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबर रोजी राज्यात १२ लाख ६२ हजार रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णांबाबत दिलेली माहिती योग्य दिसते, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याचा विचार करता महाराष्ट्रात पुढील महिन्यात रुग्णालयात मोठ्या प्रमाणात बेडची व्यवस्था करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयात मिळून १३ सप्टेंबर रोजी ५६ हजार ३५६ ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभागात १८ हजार ७८५ बेड तर ९ हजार ३९८ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. १३ ऑक्टोबरपर्यंत जवळपास सहा लाखाहून अधिक वाढणारे करोना रुग्ण लक्षात घेता यात ७ हजार ३५५ बेडची वाढ करण्यात यावी अशी स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. किमान अतिदक्षता विभागात ४ हजार ३८५ बेड, २ हजार ५८४ व्हेंटिलेटर बेड व चारशे ऑक्सिजन बेड वाढविण्यास सांगण्यात आले आहे.

तपशीलवार माहिती सादर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यातील ३६ जिल्ह्यात नेमके किती रुग्ण एका महिन्यात वाढू शकतात याची तपशीलवार माहिती सादर केली असून यानुसार विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली येथे करोना रुग्णांची संख्या सध्याच्या जवळपास दुप्पट होणार आहे. त्याचप्रमाणे वर्धा, अकोला, हिंगोली व जालना जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होणार असल्याचे म्हटले आहे. प्रामुख्याने नागपूर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांचे चित्र चिंतादायक दिसते. १३ सप्टेंबरला पुण्यात २ लाख ०८ हजार ०७३ रुग्ण होते ते १३ ऑक्टोबरपर्यंत ३ लाख २२ हजार ४७६ एवढे झाले असतील. याशिवाय नागपूर येथील ५१ हजार ४७१ रुग्णसंख्या वाढून ९८ हजार ६६३ एवढे करोना रुग्ण होतील. तर सोलापूर येथील २४ हजार ८३९ रुग्णसंख्या वाढून १३ ऑक्टोबरपर्यंत ४२ हजार ९१६ एवढी झालेली दिसेल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाढणारे करोना रुग्ण व त्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या बेडची संख्या व वाढीव बेडची गरज असा आकडेवारीचा तक्ताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाठवला आहे.

Previous post मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा:कोल्हापुरात मराठा समाजाची गोलमेज परिषद, पंधरा ठराव आज परिषदेत करण्यात आले मंजूर
Next post कोरोनाने मृत्यू झालेले राष्ट्रवादीचे कर्मचारी गौतम जाधव यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ५ लाखाचा धनादेश सुपूर्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *