आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त

बुलंद तोफांचा खानदेशी आवाज स्वकीयांनी बंद पाडला!
सत्ताधाऱ्यांचे हस्तक मिडिया ट्रायलने घेतला राजकीय बळी!!

आजही मीडियाच ठरवते नाथाभाऊंचा राष्ट्रवादी प्रवेश मुहूर्त

अरे….. नाथाभाऊंना किंवा राष्ट्रवादीला काही बोलू देता की नाही?

प्रदीप गायके
पुण्यप्रताप न्यूज नेटवर्क
जळगाव दिनांक 18

आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक मीडियाला एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळाले आहे की या स्वातंत्र्याच्या नावाखाली या मिडियाने अक्षरशः स्वैराचार चालविला आहे ! मीडियाची ही स्वैराचारी वृत्ती भारतीय लोकशाहीला घातक ठरू पाहात आहे !! दोषी गुन्हेगार वृत्तीला निर्दोष ठरवायचे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवायचे ,दोषी ठरवून त्याला फासावर लटकवायचे हे कट-कारस्थान भारतीय मिडिया मध्ये सुरू आहे ! या मीडियाचे बळी ठरलेले खानदेशचे सुपुत्र आणि बुलंद आवाज नाथाभाऊ खडसे हेही सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले असलेल्या मीडिया ट्रायल चे बळी ठरले. ते अजूनही भारतीय जनता पार्टी मध्येच आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याची वाच्यता कुठेही केली नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कुठेही म्हटलेले नाही आणि अशा अवस्थेमध्ये हा मीडिया नाथा भाऊंना टार्गेट करत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचे मुहूर्त काढत आहेत !! हे मुहूर्त काढणारी ही मिडियावाले आहेत .नाथा भाऊंनी एक शब्दही बोलला नाही .राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या प्रवेशावर ब्र शब्द उच्चारला नाही .तरीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र मध्ये सोशल नेटवर्क वरील इलेक्ट्रॉनिक मीडिया , विविध चॅनेल्स , काही वृत्तपत्रे एकांगी स्वरूपामध्ये बातम्या छापून खळबळ उडवून देत आहे .या मीडिया ट्रायल चे बळी ठरलेले नाथाभाऊ आज मात्र काहीसे शांत धीर गंभीर दिसत आहेत! त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बरेच काही सांगून जात आहे.

भारतीय जनता पार्टी चे वरिष्ठ नेते मुरब्बी राजकारणी समाज संघटक
एकनाथ खडसे यांना राजकारण ‘नीटपणे’ कळते. त्यांना ते कळले नसते तर कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्य़ात अन् खान्देशच्या तीनही जिल्ह्य़ात भाजपचा इतका झंझावात पसरला नसता. खडसे भाजपचा एकमेव खान्देशव्यापी चेहरा ठरले नसते. आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामनेरच्या सभेत खडसेंच्या गैरहजेरीत खडसेंच्याच मुरब्बी राजकारणाचा दाखला द्यावा लागला. कारण खडसेंनी दुसर्‍या पक्षाचा मार्ग धरला तर भाजपसाठी संपूर्ण खान्देश व्यापेल, असा दुसरा चेहरा भाजपकडे नाही. त्यातच समजा त्यांचा सध्याच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश झाला तर भाजपसाठी अग्निपरीक्षेची वेळ ठरेल. खडसेंच्या मागे सगळ्याच जातीपातींचा मोठा डोलारा उभा आहे. भाजपातील काही घटकांना एकनाथ खडसे दुसर्‍या पक्षात जावे, असे वाटते. त्यासाठी बर्‍याचदा जाहीर उखाळ्या पाखाळ्याही काढल्या गेल्या. भाजपांतर्गत दोन गट सतत झुंजत राहिले. खडसेंनी पक्षांतर केले तर ही झुंज संपेल. त्याचवेळी भाजपलाही खान्देशव्यापी नेत्याचाही शोध घ्यावा लागेल.

खान्देशातील भाजपाची सूत्रे जळगावमधूनच हलतात. मग विषय धुळे महापालिकेचा असो की, जिल्हा परिषदेचा असो. नंदूरबारची अवस्थाही तशीच आहे. आ.गिरीशभाऊ महाजन मागील काळात मंत्री होते. तेव्हा तर नाशिक जिल्ह्य़ातील राजकारणाचे सुकाणू त्यांनी हाती घेतले होते. मात्र महाजन यांच्या राजकारणाचा प्रभाव वाढू शकत नाही, असे त्यांच्या एकूण राजकारणावरून दिसते. मंत्री असतांना त्यांनी जळगाव व धुळे महापालिका भाजपकडे आणल्या. मात्र अशा राजकारणाला स्थानिक राजकीय किनार असते. बर्‍याच मर्यादाही असतात. भाजपातील चर्चित चेहर्‍यांपैकी हरिभाऊ जावळे आता हयात नाहीत. ए. टी. पाटील भाजपच्या राजकीय पटावरून दिसेनासे झाले आहेत. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. खासदार उन्मेश महाजन यांचे जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागावर फारसे वर्चस्व नाही.

नाथाभाऊ खडसेंनी वारंवार माझा नेमका दोष काय याची विचारणा पक्षश्रेष्ठींकडे केली. पण सत्ताकाळ उलटला तरी खडसेंना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. इतर राजकीय पक्षांमधून आलेल्यांना मात्र लाल गालिचे अंथरले. त्यातील काहींना सत्तेच्या अखेरच्या टप्प्यात का होईना मंत्रीपदे दिली. खडसेंना चार वर्षे वंचितच ठेवले.

एकीकडे खडसेंना सत्तेपासून वंचित ठेवले. त्याचवेळी इतर सगळ्या आघाड्यांवरही त्यांची कोंडी केली. विशेष बाब म्हणजे एदलाबादचे मुक्ताईनगर नामकरण करणार्‍या एकनाथराव खडसेंच्याच मतदारसंघात त्यांच्या घरातील उमेदवार पराभूत व्हावा, ही बाब सगळ्यात आश्चर्याची ठरली. राजकीय वर्तुळात अगदी खडसेंच्या विरोधकांसह कोणालाही हा पराभव पटला नाही. त्याचीच सर्वाधिक चर्चा झाली. किंबहुना हा पराभव खडसेंच्या जिव्हारी लागणारा ठरला. तरीही खडसे भाजपात थांबून होते. कोण होते या पराभवामागे? खरे तर खडसेंची राजकीय कारकीर्द दावणीला बांधली गेली. राजकीय कारकीर्द सडविण्याची प्रक्रिया समोर घडत असूनही ती उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय कोणताही पर्याय खडसेंसमोर नव्हता.

तरीही एकनाथराव खडसे यांनी आतताईपणे कोणताही निर्णय घेतला नाही. धुळे विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे यांचीही भाजपने अशीच कोंडी केली तेव्हा अनिल गोटे यांनी भाजपला तडकाफडकी सोडचिठ्ठी दिली. खरे तर गोटे जनसंघापासून कार्यरत होते. मात्र भाजपात सडवून बाहेर फेकण्याचा धोका ओळखून बरेच जण बाहेर गेले. खडसे मात्र जुन्या गोतावळ्यात अडकून पडले होते.

जळगाव जिल्ह्य़ाच्या राजकारणात तेजस्वीपणे तळपणारे व नेहमी पक्षबदल करीत जिंकून येणारे नेते सुरेशदादा जैन यांचा स्वकर्तृत्वावर इतका विश्वास होता की, मागील काळात बोलता बोलता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘सडवून’ टाकीन, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सुरेशदादा जैन व जळगाव जिल्ह्य़ाचे राजकारण इतके बदलले की कोण, कसे सडले अन् राजकिय विजनवासात गेले ते लोकांना लवकर कळलेच नाही. सुरेशदादांचे वक्तव्य संतापात निघाले. पण राजकारणात सडविण्याची प्रक्रिया खरोखर घडते, हा दाहक अनुभव एकनाथराव खडसे यांनी मात्र ज्वलंतपणे बर्‍याचदा घेतला.
भाजपचा सगळ्यात मोठा नेता, पण नेहमी सत्तेपासून दूर, अशी शोकांतिका एकनाथ खडसे यांच्याबाबत झाली. जळगाव जिल्ह्य़ात भाजपचा जो नेता आला तो खडसेंना ज्येष्ठ म्हणत कोपरखळ्या मारत राहिला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या वरिष्ठ वर्तुळात सतत उठबस असतांनाही खडसेंचे पंख कोण, कुठून कापते, याचा त्यांना लवकर पत्ता लागला नाही. जेव्हा पत्ता लागला तेव्हा उशीर झाला होता. खडसेंच्या हाती काहीच राहिले नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, असे सगळेच चाणाक्ष धुरीण सांगत राहिले. आता पत्ते एकनाथ खडसे यांच्या हाती आहेत. समजा त्यांना मंत्रीपद मिळाले तर बर्‍याच राजकीय बाबी नव्याने घडतील. त्याचाच धाक राजकीय वर्तुळातील बर्‍याच जणांना राहील.

………………
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला आताशी कुठे एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारला सध्याच्या परिस्थितीत कोणताही धोका दिसत नाही. भाजपातून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आले तर इतर नाराजांचीही पावले महाविकास आघाडीकडे वळतील. त्यातून आघाडी आणखी बळकट होईल.
—————————————————-

 

 

Previous post जळगाव कृ.उ.बा.समितीजवळ अपघातात दोघे ठार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *